top of page
FINAL.png

मीना चौधरी

प्रेमांजली

विनय प्रथम..

 

आणि आत्ता मीना!

 

केवळ एकाच महिन्यात दोन आघात.

विनयचं दुखणं तरी कानावर होतं. पण मीना? मीनाबद्दल काही कल्पनाच नव्हती. किरकोळ दुखण्यासाठी ती हॉस्पिटलमध्ये  गेली. आणि गेली ती गेलीच. परत  न येण्यासाठी.

 

नुकत्याच झालेल्या आपल्या पिकनिकच्या वेळी आपल्याबरोबर किती आनंदात एन्जॉय करत होती ती ! आणि साड्यांच्या शूटच्या वेळी आपल्या गळ्यात हात घालून फोटो काढून घेत होती ती. कालपरवापर्यंत आपल्या अवतीभोवती वावरणारी, आपल्या क्लबच्या सगळ्या कार्यक्रमात भाग घेणारी, प्रत्येक इव्हेंटच्या वेळी मदतीला उभी राहणारी आपली लाडकी मैत्रिण मीना अचानक आपल्याला सोडून गेली हे स्वप्नांत तर घडत नाही ना असं वाटतंय. 

 

संजीव आणि मीना हे आपल्या क्लबमध्ये अगदी सर्व कामाला तत्पर असत. मीना क्लबच्या अनेक इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये मदत करायची.

पिकनिक असो, नुकताच केलेला ॲन्सचा कार्यक्रम असो, नृत्य असो मीना उत्साहाने भाग घ्यायची.

नेहमी प्रसन्न आणि हसतमुख असणारी मीना आपल्या क्लबची जान होती. कधीही कुरकुर नाही, कुणाबद्दल वाईट बोलणे नाही.. अगदी प्रेमळ आणि मनमिळाऊ!

जळगावी पाककृती करून मित्रांना खायला घालणे तिला खूप आवडायचे. तिच्या हातचं वांग्यांचं भरीत किंवा शेवभाजी अनेकांनी खाल्ली आहे. आणि पाककृती विचाराल तर लगेचच मागचं पुढचं हातचं राखून न ठेवता सांगून टाकायची.

तिच्याबद्दल श्रद्धांजली पुश काढावा लागेल याची कल्पना नव्हती.  मीना गेल्यावर तिच्या मैत्रिणींनी तिच्याबद्दल भावना व्यक्त करणारे लेख  पाठवले, फोटो पाठवले. सोमवारच्या श्रद्धांजली सभेत अनेकांनी तिच्याबद्दल उत्स्फूर्तपणे भावना व्यक्त केल्या.

मीनाची आठवण कायम येत राहील. तिच्या जाण्याचा आज तेरावा दिवस. ईश्वर तिला सद्गती देवो आणि संजीव आणि हर्षवर्धन, प्रियांका, अभिषेक यांना हा आघात पचविण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना.

मीनाला प्रेमपूर्ण श्रद्धांजली......प्रेमांजली.

पुश टीम

दि. १८ ऑक्टोबरला झालेल्या श्रद्धांजली सभेचा व्हिडिओ

मितभाषी मीना


मीना तशी कमी बोलणारी होती. माझ्याशी ती खूप वेळा डायट वरच बोलायची आणि आहासंबंधी बऱ्याच गोष्टी तिला माहिती पण होत्या. त्यामुळे मला नेहमीच वाटायचं किती छान कंट्रोल करते तिच्या शुगरला. पण त्याच शुगरने तिला एवढा मोठा दगा दिला. अगदी चार दिवसांपूर्वी जोशी हॉस्पिटल मध्ये भेटायला गेले तेव्हा खूप मोकळेपणाने बोलली. कोणतेही टेन्शन दिसलं नाही. म्हणलं खूप धीराची आहे. पण आज तिच्या निधनाची बातमी ऐकून धक्काच बसला. तिच्याकडे भिशीला गेलो होतो मागे तेव्हा आठवतंय की पाहुणचार म्हणजे किती तो! जास्त पदार्थ करायचे नाहीत असं ठरवलं होतं तरीही हिने मात्र अनेक पदार्थांनी डिश भरून वर पालक सूप सुद्धा केलं होतं. तिच्या जळगावी पद्धतीच्या वांग्याच्या भरिताची चव तर अनेकांनी घेतली आहे. तसेच जळगावचे प्रसिद्ध ज्वारीचे पापड तिने अनेक मैत्रिणींना स्वतः नेऊन दिलेत. घरी येताना नेहमी स्वतः केलेला पदार्थ ती आणायची ही तिची खासियत होती. अशी मितभाषी मीना आपल्याला अचानक सोडून गेली यावर विश्वासच बसत नाही.  ईश्वर  तिला सद्गती देवो आणि तिच्या कुटुंबाला या दुःखातून पार होण्याची शक्ती देऊ हीच सदिच्छा.

​रो. शोभा राव

माझी गोड मैत्रिण

मीना कालवश झाल्याची बातमी मला थोडी उशीरा समजली. म्हणजे मीच गावाला गेले असल्यामुळे व्हाट्सअप थोडा उशिराच बघितले. तोपर्यंत त्यावर भरपूर मेसेज आले होते. मी पुन्हा पुन्हा ते वाचत राहिले. पण माझे मन काही ते स्वीकारायला तयार होईना.

मीना आता आपल्यात नाही? असे कसे होईल? इतकी गोड स्वभावाची माझी मैत्रीण अशी तडकाफडकी निघून कशी जाईल?  काही तरी चुकते आहे.

आता थोड्याच वेळात तिचा व्हाट्सअप वर मेसेज येईल. ती माझ्याशी गप्पा मारेल. फेसबुक वरचे तिचे फोटो बघून मी त्यावर कॉमेंट करेन. 'वांग्याचे भरीत तयार आहे गं प्रतिमा, जाता जाता देते तुला!' असा तिचा फोन येईल. 'आज क्लब मध्ये तुमच्या बरोबर येते गं मी', असा तिचा मेसेज येईल.

पण छे ! यातले काहीच आता होणार नाही. मीनाचा गोड आवाज मला कधीच ऐकायला मिळणार नाही. तिने बाल्कनीतून काढलेले छान छान फोटो मला बघायला मिळणार नाहीत. ती मला नेहमी म्हणायची 'आपण दोघी तूळ राशीच्या गं प्रतिमा, म्हणून आपले खूप जमते.'

आता सतत काही ना काही कारणाने मीनाची आठवण येत राहील आणि पुन्हा पुन्हा ही बातमी खोटी असेल का? असे वेडे मन म्हणत राहील.

सर्वांशी मिळून मिसळून राहणारी, घरातील सर्वांना एकत्र बांधून ठेवणारी, घरातील सर्वांच्या आवडीनिवडी जपणारी, त्यासाठी सतत प्रयत्न करणारी माझी गोड मैत्रीण आता मला कधीच भेटणार नाही.

संजीव या प्रसंगाला तोंड देण्याचे बळ तुला मिळो. एवढीच प्रार्थना आता मी आणि प्रदीप करू शकतो. आम्ही दोघे तुमच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत. ईश्वर मीनाच्या आत्म्यास सद्गती देवो.

ओम शांती |शांती |शांती|

ॲन. प्रतिमा दुरुगकर

आमची सुगरण मैत्रिण

माझ्या बायकोची बाल आणि शाळेतली मैत्रीण मीना. आम्ही रोटरीमध्ये आल्यावर कित्येक वर्षांनी या मैत्रिणी एकमेकींना भेटल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा त्या वेळेचा आनंद मी अजूनही  विसरू शकत नाही. पाहता पाहता संजीव आणि मी पण मित्र झालो. निखळ मैत्रीमध्ये एकमेकांच्या कुटुंबाची जी जी खेचली जाते त्या खेचण्यातला आनंद आम्ही दोन्ही कुटुंबियांनी मनसोक्त घेतला. मीना कधीच या खेचाखेचीत चिडलेली पाहिली नाही.

मला तिखट आवडतं म्हणून अस्सल खान्देशी मिरच्यांची भाजी माझ्याकरता मीनाकडून हमखास यायचीच. आणि खानदेशी वांग्याचे भरीत करावं ते फक्त मीनानेच हे सुद्धा मी माझ्या बायकोला बिनधास्त सांगायचो. त्यामुळे भरीत आणि मिरचीची भाजी मीनाने तिच्या घरी केली की त्यातला एक वाटा माझ्याकरता राखीव असायचा. कारण तिला तिथे उचक्या लागायच्या असे मी नेहमीच गमतीत म्हणायचो. 

मीना तीन दिवसापूर्वी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट काय होते आणि पाहता पाहता या जगाचा निरोप घेऊन मीना निघून जाते काय! यावर विश्वास बसणे अशक्य आहे. १५ ऑक्टोबरची सकाळ एका वाईट बातमीने आणि ती सुद्धा आपल्याच कुटुंबातील असलेल्या एका हसऱ्या चेहऱ्याच्या मुलीच्या निधनाने व्हावी यासारखे अजून मोठे दुर्दैव काय? हर्षदच्या लग्नानंतर 'आता अभिषेकचं लग्न झालं की माझी कौटुंबिक जबाबदारी संपली आणि मग मी छान हिंडणार' असं म्हणणारी मीना अशी मोठी जबाबदारी वाऱ्यावर सोडून कशी निघून जाऊ शकते? आणि ते सुद्धा कोणतीही पूर्वकल्पना न देता ? हा असा काही खेळ करण्याची का देवाला इच्छा व्हावी आणि त्याला तरी असं करण्याचा काय अधिकार आहे ? असो. संजीव, हर्षद, अभिषेक आणि प्रियांका यांना तर हे दुःख सहन करावंच लागणार आहे आणि ते सहन करायची शक्ती त्या विधात्याने त्यांना द्यावी ही विनंती करण्यापलीकडे आपण काय करू शकतो? एक मात्र नक्की की माझ्या बायकोला आणि मला एक मिळालेली छान मैत्रीणीला आम्ही आज गमावलं.

रो. अजय गोडबोले

माझी बालमैत्रिण मीना


माझी शाळामैत्रिण आणि त्यापेक्षा सुद्धा जास्त बेंच-फ्रेंड आज काळाच्या पडद्याआड गेली आहे. मला अजूनही आठवतात ते शाळेतले दिवस. लांबसडक केसांची आमची जोडगोळी आणि अभ्यासातसुद्धा सतत पहिला की दुसरा नंबर अशी आमची स्पर्धा. पण या स्पर्धेमध्ये इर्षा, खुन्नस याचा मागमूसही नसायचा. शालेय शिक्षण झाल्यानंतर कॉलेजमध्ये आमच्या वाटा वेगळ्या झाल्या. कॉलेज कालावधीत काही वेळा आमची भेटसुद्धा झाली होती. मात्र लग्नानंतर वाटा वेगवेगळ्या झाल्या. फक्त 'मीना पुण्यामध्ये आली' एवढीच बातमी माहिती होती. पण दुर्दैवाने खूप वर्षे काही संपर्कच राहिला नव्हता.

शेखर प्रेसिडेंट असताना अजय आपल्या क्लबला जॉईन झाला. मात्र त्याच्या आधी ज्या मीटिंग्ज होतात, त्या पहिल्याच मीटिंगला मीना अचानक एकदम माझ्यासमोर आली. आम्हाला दोघींना एकमेकींना बघून जणू काही कोहिनूर हिरा सापडला एवढा आनंद झाला होता. पृथ्वी गोल आहे याचे प्रत्यंतर त्यादिवशी आलं आणि माझी एक हरवलेली मैत्रीण मला मिळाली. शाळेतली गट्टी परत मैत्रीच्या भट्टीत बदलली. अर्थात मैत्री टिकू शकते ती घरच्यांच्या पाठिंब्यामुळे. पाहता पाहता अभिषेक-हर्षद आणि नंतर प्रियंका यांनी मला मावशीचं स्थान दिलं. अजय आणि संजीवची पण इतकी छान मैत्री जमली. अजय मला नेहमी म्हणतो की तुझ्या मैत्रिणीमुळे एक मला चांगला मित्र मिळाला.

नुकतीच झालेली गणपती ट्रिप आणि त्यानंतर दोन वेळा झालेली आमच्या अगदी ताज्या भेटी आणि प्रत्येक भेटीत काहीतरी नवीन विषयावरच्या नवीन गप्पा यातर विसरणे अशक्य. 

 

तीन दिवसापूर्वी मीनाला हॉस्पिटलमध्ये सौम्य हार्ट-ॲटॅक आला म्हणून ऍडमिट केलं आणि आयसीयूमध्ये सुद्धा इतकी ती भरभरून बोलत होती आणि सांगत होती की, "अगं, मी ठीक आहे! मला बरं वाटतंय!" मला तिला सांगावं लागलं, "अगं, जरा कमी बोल. नंतर आपल्याकडे भरपूर वेळ आहे गप्पा मारायला." 

 

१५ ऑक्टोबरला सकाळी सव्वा सात वाजता "मीना गेली" हे शब्द उकळत्या तेलासारखे कानात ओतले गेले. त्यावर विश्वास ठेवायची मानसिक तयारीच नव्हती आणि हे कटू सत्य पचवायची ताकद पण नव्हती. परमेश्वर कधीकधी किती कठोर वागतो आणि याचा त्याला जाब विचारायची इच्छा का न मनात यावी ? सगळ्या अडचणींना तोंड समर्थपणे देऊन संजीवच्या पाठीमागे समर्थपणे उभी राहणारी मीना आणि तिच्या मुलांना घडवणारी ही माझी मैत्रीण त्यांना सोडून अशी अचानक निघून जाईल एक कल्पना सुद्धा स्वप्नात कधी आली नव्हती. या सगळ्या कुटुंबाला हे दुःख पचवण्याची शक्ती तरी दे हीच परमेश्वराला प्रार्थना.
 
मीना, का गं आपल्या मैत्रीचा बंध एवढ्या निष्ठूरपणे तडकाफडकी तोडलास ?

ॲन. अंजली गोडबोले

सौम्य स्वभावाची मीना

मीनाला रागावलेली, चिडलेली कधी पाहिलीच नाही. तिच्या बारीक आवाजात, हसत बोलत असायची. संधी मिळाली की फोटो काढायला पोझ देऊन तयार. अतिशय सौम्य स्वभावाची मीना पटकन् एकटीने कुठेही न जाणारी मीना दसऱ्याच्या मुहूर्तावर इतकी मोठी उडी मारून असं सिमोल्लंघन करेल असं कोणाला खरंही वाटणार नाही. मीना बहुतेक तुझ्या हसऱ्या चेहऱ्याची ईश्वराला स्वर्गात जास्त गरज वाटली असावी. तुझ्या निर्मळ आत्म्यास सद्गती मिळो येवढीच प्रार्थना.

रो. वृंदा वाळिंबे

आठवणीतील मीना

मी आणि ' सी डी' एका फिल्मसाठी शूटिंगला गेलो होतो आणि तिथे अचानक मीना आणि संजीव आले. त्या दोघांना पाहून आम्हाला खूपच आश्चर्य वाटलं. मी विचारलं 'तुम्ही येथे कसे काय?'  आम्हा दोघांचा  कॉमन  ओळखीचा माणूस होता. त्यांनी त्यांना बोलावले होते.शूटिंग झाले आम्ही दिवसभर एकत्र होतो. साधारण सहा महिन्यानंतर मी तिला विचारलं, "अगं तुला त्या शूटिंग चे काही पैसे मिळाले का तर म्हणाली नाही गं. काहीच नाही. आणि  असे पैसे मिळतात का याची मला काहीच माहिती नाही." तिने शेवटपर्यंत त्यांना विचारलं नाही आणि तिला त्याची बिदागी मिळाली नाही.

दुसरी आठवण. अगदी नवीन नवीन ती जेव्हा रोटरी मध्ये आली तेव्हा आम्ही पौड रोडला राहत होतो. सीडींच्या एका वाढदिवसाला ती एक अतिशय सुंदर चविष्ट असा जळगावी पदार्थ आणि केक घेऊन आली होती. जळगावचे भरीत हा शब्द काढला की तिला अगदी प्रचंड आनंद व्हायचा आणि म्हणायची की "तू घरी ये. मी तुला करून देते खायला" अशी भरभरून आणि आनंदाने जगणारी माझी मैत्रीण अशी अचानक नाहीशी झाली.

 

खरं तर मन मानायलाच तयार नाहीये.  अतिशय अबोल, खरी व निस्वार्थी मैत्रीण परत मिळणार नाही. ईश्वर तिला शांती देवो.


ॲन. सीमा महाजन

मीना - एक सोज्ज्वळ व्यक्तिमत्त्व

मीना, खरंच एकदम शांत सोज्वळ आणि पापभिरू व्यक्तिमत्त्व. कधीही भेटलं तरी कायम हसतमुख आणि मदतीला तत्पर.

संजीव आणि मीना दोघंही गाण्याच्या माहितीतले एक्स्पर्ट आहेत. कोणत्या पिक्चरला कुणाचं संगीत, कुणाचा आवाज ह्या सगळ्या माहितीचा अगदी मोठा खजिना. संदीप एक 'सलील चौधरी' वर गाण्याचा कार्यक्रम करणार होता, तर यूट्यूब downloads, कोणती क्लिप कशी कमी करायची वगैरेसाठी दोघं आले होते. माझा सोपा आणि सुटसुटीत मेनू म्हणजे पावभाजी. किती वेळा तिने पावभाजी खूप छान झाल्याचं आणि वेगळं तिखट केल्याचं कौतुक करून सांगितलं!

मागच्याच वाढदिवसाला तिच्या मोबाईल मध्ये काढलेला फोटो शोधून पाठवला होता. 

आम्हाला सगळ्यांना special खान्देशी पदार्थांची चव तिच्यामुळेच चाखायला मिळाली. कळण्याचे पराठे, भरीत आणि खर्डा. संदीप तिला सांगायचा की हिला भरीत शिकव आणि मी तिला सांगायची की ते कायम तूच कर मी फार तर कळण्याचे पराठे शिकेन. तर लगेच दुसऱ्या दिवशी पीठ कसं करायचं त्यापासून ते पराठ्यांपर्यंतची रेसिपी व्हॉट्सॲप वर. 

तिच्या कडून सॉफ्ट आणि गोड बोलणं शिकायचं राहूनच गेलं.  

कायमच अभिषेक आणि हर्षवर्धन ह्यांच्या बद्दल प्रेमाने बोलणारी मीना, गेल्या वर्षभरात प्रियांकाबद्दलही तेवढ्याच आपलेपणाने बोलायला लागली. "अगं work from home मधे  त्यांना डिस्टर्ब व्हायला नको म्हणून मी सध्या फोनवर खूप बोलत नाही". इतकी सगळ्यांची काळजी करणारी आणि घेणारी मीना, आपल्याला अगदीच अचानक सोडून गेली.

"अगं, असं नाही बरं, मी तुला सांगते...." अशी सुरवात करून मग हळूच काहीतरी मोकळेपणानं  सांगणारी आपली एक छानशी मैत्रिण गेली.

ॲन. वैशाली तपस्वी

निर्मळ स्वभावाची मीना

खरं सांगायचे तर असा लेख कधी लिहावा लागेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. परवाच मी माझ्या एका मुलाखतीत 'माणसे आहेत तोवर त्यांच्याशी बोला; त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते सांगा' असे बोलले होते. नंतर मला ही आश्चर्य वाटले होते की मी असे का म्हटले असावे? आज दिवसभर मला ते आठवत राहिले. साड्यांचा व्हिडीओ करायच्या वेळी खरंतर मी एकच दिवस थोडावेळ तिथे गेले होते. पण त्यावेळेस मला असे वाटले की मीना थकलेली वाटते आहे, तिच्याशी बोलायला पाहिजे. पण नंतर फोन करू करू करत, कामाच्या धबडग्यात राहून गेले. आणि आता कधीच बोलता येणार नाहीये याची जाणीव झाली.

 
मीनाची आणि माझी ओळख फेसबुक वरची. त्यावेळी फेसबुक नवीन होते. जुनी गाणी हा आमच्या मैत्रीचा दुवा होता. मीनाने एक सीडीही मला पाठविली होती. दिलेली पोस्ट प्रामाणिकपणे काम करून त्या पोस्टला न्याय द्यायचा या माझ्या स्वभावाप्रमाणे मी मेंबरशिप डायरेक्टर असताना, फेसबुकचा उपयोगही मी मेंबर आणण्यासाठी केला होता. आणि 'मीना' आणि 'अश्विनी' या माझ्या फेसबुक फ्रेंड्सना आपले सभासद करून घेतले. मीना पटकन क्लबमध्ये रूळली. दोन वर्षानंतर संजीव मेंबर झाला. संजीव क्लबचा सेक्रेटरी असताना मीनाने मला उत्तम साथ दिली. घर सांभाळून ती सर्व वेळी माझ्याबरोबर असायची. अतिशय शांतपणे, न बोलता, न चिडतां ती खंबीरपणे उभी असायची. सर्वांना आपलेसे करून घेण्याची तिची वृत्ती वाखाणण्यासारखी होती. संजीव आणि मुलं हे तिचे सर्वस्व होते. त्यांच्यासाठी ती सतत कार्यमग्न असायची.

नंतर मी डिस्ट्रिक्टमध्ये बिझी झाले. फोन करणे, संपर्कात राहणे हा माझा स्वभाव नाही. पण मीना संपर्कात राहत होती. मधेच एखादा माझा फोटो मला पाठवायची. त्याचे कौतुक व्यक्त करायची. आम्ही सतत एकमेकींच्या संपर्कात नव्हतो. पण तिचे प्रेम जाणवत राहयचे.  अपार मायेने भरलेले तिचे डोळे सतत प्रेमाचा वर्षाव करताहेत असे वाटायचे.

अतिशय निर्मळ स्वभावाची मीना आज नाही यावर विश्वास बसत नाही. दस-याचा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा दिवस तिने जाण्यासाठी निवडला.

मागच्या महिन्यात विनय गेला, आज मीना. कधीही हाक मारली की येतील अशी खात्री असलेले हे दोन आधार आज नाहीत. माझ्यावर नि:स्वार्थ  प्रेम करणारी माणसे कमी होत आहेत ही भावना खूप जीवघेणी आहे. ईश्वरीय संकेत काही वेगळेच असतात बहुतेक.

रो. गौरी शिकारपूर

राहिल्या आता फक्त आठवणी...

मीना आज आपल्यात नाही या गोष्टीवर विश्वास ठेवणे कठीण जात आहे.

दसऱ्याच्या धामधुमीत सकाळीच व्हॉट्सॲपवर येऊन पडलेल्या बातमीकडे लक्ष पट्कन गेलं नाही. पण नंतर बातमी वाचली आणि मी एकदम बधीर झाले. पोटात एकदम खोल खड्डा पडल्याची जाणीव झाली. पाठीच्या कण्यातून एकदम गार हवा जात आहे असं वाटू लागलं. हात थरथरायला लागले. आणि एकदम मटकन खाली खुर्चीवरच बसले मी. थरथरत्या आवाजात मी यांना हाक मारली आणि म्हणाले, "अहो, हे पहा काय आलंय व्हॉट्सॲपवर! आपली मीना गेली म्हणे." 

हे बाहेर पळत आले..."कोण म्हणालीस?"

"अहो, मीना. मीना चौधरी"

 

आम्हां दोघांना प्रचंड धक्का बसला होता. 

मीना - संजीवची आमची ओळख खूप जुनी म्हणजे ते दोघं रोटरीमध्ये यायच्या आधीपासूनची. आमच्या दोघांचे फ्लॅट पौड रस्त्यावरील जोग हॉस्पिटलसमोरच्या एकाच बिल्डिंगमध्ये होते. त्यावेळी त्या सोसायटीचा सेक्रेटरी संजीव चौधरी होता. सोसायटीच्या कामासाठी त्यांच्याकडे अनेक वेळा जावे लागत असे. दोघेही आमच्याशी पहिल्या भेटीतच  "कनेक्ट" झाले. संजीव त्यावेळी अनेक वेळा ऑफिसच्या कामाच्या दौऱ्यावर असायचा. मीनाच आम्हाला भेटायची. कायम उत्साही, हसतमुख आणि कामसू. अतिशय मनमिळावू, प्रसन्न.   काही वर्षांनी आम्ही आमचा त्या सोसायटीमधील फ्लॅट विकला. त्यानंतर आमचा कायम होणारा संपर्क बंद पडला. काही वर्षे गेली.

एकदा मोहिनी बर्वेकडे मेहंदीचा कार्यक्रम होता. क्लबमधील अनेक बायका जमल्या होत्या. तेव्हा गौरी (शिकारपूर) बरोबर मीना 'गेस्ट' म्हणून तिथे आली. मला पाहून तिने एकदम आनंदाने मिठीच मारली. आम्ही दोघे एकमेकांना बघून खूप खुश झालो. मला ती म्हणाली की, "अगं, मी संजीवला म्हटलं, की रोटरीमध्ये आपल्या ओळखीचं कोणी नाहीये. कसं व्हायचं? आता तुम्ही आहात. मला खूप बरं वाटतंय".  रोटरीला मीना रोटेरियन म्हणून जॉईन झाली. चौधरी कुटुंबाशी परत संपर्क जोडला गेला. भिशीला बरोबर जाणं-येणं, खुशालीचे फोन वगैरे सुरू झाले. नंतर १३-१४ साली शेखर प्रेसिडेंट असताना संजीव रोटेरियन झाला आणि मीना ॲन झाली.

नुकतेच १९ सप्टेंबरला आपल्या क्लबच्या BODचे हार्वेस्ट क्लबला आयोजन केले होते. मीना आणि मी आमने सामने बसलो होतो. नुकताच विनयचा श्रद्धांजली पुश प्रसिद्ध झाला होता.  मीना मला म्हणाली की " गिरिजा, विनयांजली पुश खूप छान झाला आहे".  त्यावर मी तिला म्हणाले की "तो पुश काढावा लागला नसता तर किती छान झालं असतं ! 'चांगला झाला' म्हणायला सुद्धा नको वाटतं. परत कुणाची स्मरणिका काढण्याची पाळी कधी पुश टीम वर न येवो." मीना म्हणाली, "हो ना ! बरोबर आहे."

भविष्यात काय वाढून ठेवलं आहे ते मानवाला अज्ञात असतं तेच चांगलं आहे. केवळ एका महिन्याच्या आतच आपली ही मैत्रिण आपल्यात नसणार आहे आणि  मीनासाठीच 'स्मरणिका'रूपी पुश काढावा लागणार आहे अशी कल्पनासुद्धा नव्हती. किती हा दैवदुर्विलास. 

आम्हा ॲन्सचा साड्यांचा व्हिडिओ काढायचा निर्णय झाला त्यावेळी सुद्धा पटकन तिने होकार दिला. त्या व्हिडिओसाठी ती 'अमाया' हॉटेलमध्ये मिटींगला सुद्धा आली होती. खूप मजेत होती. शूटिंगच्या दिवशी सुद्धा आम्ही दोघी एकत्र आलो-गेलो. दुसऱ्या दिवशी अंजली गोडबोलेकडे श्रमपरिहारासाठी पण ती आली होती. जिने चढून गच्चीवरसुद्धा आली. पण त्यावेळी ती नॉर्मल होती. तिला धाप वगैरे लागली नव्हती. जरासुद्धा शंका आली नाही की असं काही विपरीत घडणार आहे. घरी येताना मी तिला म्हटलं की "मला पुढच्या पुशसाठी तुझ्या चविष्ट जळगावी शेवभाजीचा व्हिडिओ करून देशील का?" तर ती लगेच 'हो' म्हणाली. मी तिच्या 'शुगर' बद्दल चौकशी केली तर म्हणाली की "मी आता  शुगर चेक करणे सोडूनच दिलं आहे. मी तिला म्हटलं देखील "अगं मीना, असं करू नकोस. स्वतःची काळजी घे. वेळच्या वेळी तपासण्या करून घ्याव्यात." त्यावेळी तिनं ते हसण्यावारी नेलं.

पुशच्या कामानिमित्त संजीवबरोबर माझे फोन होत असतात. काहीच दिवसांनी मी संजीवला फोन केला होता. त्याने फोन उचलला नाही. म्हणून मी मीनाला फोन लावला. ती म्हणाली "अगं, मला बरं वाटत नाहीये. मी डॉक्टरकडे निघालेय." मी म्हटलं "ठीक आहे. नंतर बोलू". मी फोन ठेवला. मला वाटलं, तिला नेहमी सायनसचा त्रास होतो त्याच्यासाठी डॉक्टरकडे गेली असेल. दुसऱ्याच दिवशी (मला वाटतं, बहुधा १२ ऑक्टोबरचा दिवस असावा) संजीवला पुन्हा कॉल केला. त्याने उचलला नाही म्हणून मी परत मीनाला कॉल केला. तर तिने 'आय सी यू' मध्ये फोन उचलला आणि म्हणाली "अगं, मी जोशी हॉस्पिटलला आयसीयूमध्ये ऍडमिट आहे. मला ॲटॅक येऊन गेला." तिचा आवाज खोल गेला होता. मी अवाक् झाले. "काय म्हणतेस काय मीना तू? कशी आहेस आता?" मीना म्हणाली, "मी आता बरी आहे. अगं, शुगरमुळे सगळा प्रॉब्लेम झालाय! आता खाली आली आहे शुगर. शुक्रवारी अँजिओग्राफी करणार आहेत."

ती वेळ आलीच नाही. १५ तारखेला सकाळी तिच्या निधनाची बातमी व्हॉट्सॲपवर आली. असं कळलं की ती सकाळी सहापर्यंत ठीक होती. अचानक तिला तीव्र हार्ट ॲटॅक आला आणि ती त्यातून वाचू शकली नाही. साडेसहाला ती अनंतात विलीन झाली. बातमी वाचून मन सुन्न झाले. 

ईश्वर तिच्या आत्म्यास सद्गती देवो आणि संजीव व तिच्या मुलांना हा आघात पचविण्याची शक्ती देवो हीच माझी देवाकडे प्रार्थना. मीनाची आठवण कायमच येत राहील. 

ॲन. गिरिजा यार्दी

आणिक स्मृती ठेवुनी जाती...

RememberanceRtn. Rujuta Desai
00:00 / 01:37

रो. ऋजुता देसाई

स्मृतिगंध

bottom of page