top of page
image228140.png

फिरुनी नवा जन्मेन मी

 

विनय गेला. 

जाताना चुटपुट लावून गेला. हळहळ लावून गेला.

 

दिलखुलास, हसतमुख, नित्य प्रसन्न राहणारा, प्रेमळ, जीवाला जीव देणारा, जीव लावणारा आपला मित्र अचानक अकाली एक्झिट घेऊन अनंताकडे झेप घेऊन गेला.

 

मागे आपल्या क्लबची ट्रीप कर्दे येथे गेली असतानाच त्याच्या आजाराची बातमी प्रथम समजली. त्यावेळी त्याचं हे दुखणं इतकं विकोपाला जाईल याची कल्पना कुणालाच नव्हती. त्यातूनही तो आता बरा होत आहे अश्या बातम्या कानावर यायच्या. तो हिंडायला फिरायला लागला आहे हे समजले की आनंद व्हायचा. पण अचानक अनपेक्षितपणे विनय अकाली गेल्याची बातमी आली आणि मन सुन्न झालं.

 

विनय म्हणजे लाघवी स्वभाव, मधाळ हास्य. हसरं आणि बोलकं आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व. पहिल्याच भेटीत आपलंसं करून घेण्याची कला त्याच्याकडे होती. He was always very friendly with everybody. प्रत्येकाशी पट्कन नाळ जुळत असे विनयची. तो प्रत्येकाची जिव्हाळ्याने विचारपूस करायचा. प्रत्येकाच्या अडचणीच्या वेळेला तो धावून जायचा. त्यामुळे त्याचा मित्र परिवार मोठा होता यात काही नवल नाही.

 

त्याचा कायम अतिशय सकारात्मक दृष्टिकोन असायचा. त्याच्या आभावलयातून (aura) नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न तरंग सभोवती आसमंतात पसरत असत. त्याच्या परिघात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस त्याच्या सकारात्मक वृत्तीचा संसर्ग व्हायचा.

 

अतिशय उत्साही स्वभाव होता विनयचा. क्लबच्या प्रत्येक गोष्टीत त्याचा सहभाग असे. नाटक असो की नृत्य, गाणं असो किंवा नाट्यवाचन. पिकनिक असो किंवा क्लब डे. विनय आणि दीपा असणारच. दीपकच्या डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्सच्या आमंत्रणात माधवराव पेशव्याची भूमिका असो किंवा 'गुरूबळ' मधला हिरो गुरू असो, 'चूहे' मधला उंदीर असो, 'दगड' मधील 'दगडु धोंडू पत्थरे' असो किंवा 'ऐसी भी बाते होती हैं' मधला 'विनय साने' असो, विनय सगळ्यात उत्साहाने भाग घ्यायचा. अजूनही त्याच्या गच्चीवर होणाऱ्या नृत्य प्रॅक्टिसेस आठवत आहेत. त्यावेळी त्यानं आणि दीपानं केलेलं आदरातिथ्य, 'स्नेहबंध डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्सच्या सांगीतिक आमंत्रणाची प्रॅक्टिस, 'कोलावेरी' वरचा डान्स , तसाच 'अगर मैं कहुं' या गाण्यावरचा  बॉल डान्स, त्याच्या सहभागाच्या आणि सहवासाच्या गोष्टी स्मरणात कायम राहतील. 

 

"दुर्दम्य आशावाद"  हा त्याचा आणखी एक गुण. एव्हढं मोठं दुखणं होतं त्याला पण कधी त्याने त्याबद्दल कुरकुर केली नाही. "कसा आहेस विनय" असं विचारलं की "मस्त"  असं त्याचं दिलखुलास उत्तर यायचं. दुखण्याचं रडगाणं  कधी तो गायला नाही. "आता मी ठीक आहे.  फिरायला किंवा सायकलिंगला सुरुवात केली आहे" असं सांगायचा.

 

विनय म्हणजे अजातशत्रू. जगन्मित्र ! कोणाशी पंगा घेणं हे त्याच्या स्वभावातच नव्हतं. कुणाचीही टवाळी, निंदा किंवा टीका त्यानं केलेली कोणी कधी ऐकली नाही.  समोरून नाहीच पण मागूनही नाही. एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागे त्या व्यक्तीविषयी चांगलं बोलणाऱ्या व्यक्ती कमी असतात. विनय त्यापैकी एक होता. त्याच्यासमोर कोणी एखाद्यावर टीका केली तरी तो त्यात कधी भर घालायचा नाही, फोडणी किंवा मसाला घालायचा नाही. उलट हसत हसत विषय बदलायचा. 

 

समाजात चार माणसं एकत्र येतात तिथं राजकारण खेळतात असं म्हणतात. विनयनं कधीच कुठल्या हीन राजकारणात भाग घेतला नाही. त्याचा स्वभाव उमदा होता. तो कधी कुणाच्या चुका काढत बसत नसे. उलट प्रत्येकाशी प्रोत्साहनपर बोलायचा. क्लबमध्ये नवीन आलेल्या सभासदाबरोबर तो आवर्जून बोलायला जायचा. तितकाच श्रेष्ठींना मान द्यायचा. बरोबरच्या मित्र-मैत्रिणींबरोबर तर हंसी मजाक सुरूच असायचा. त्यामुळे तो सगळ्यांचा होता. प्रत्येकाला तो आपला मित्रच वाटायचा.

 

प्रकृती चांगली होती तेंव्हा क्लबच्या प्रोजेक्ट्स मध्ये तो कायम पुढे असायचा. प्रत्येक प्रेसिडेंटच्या मागे तो उभा राहत असे. अगदी झोकून देऊन काम करत असे. प्रेसिडेंटला योग्य ठिकाणी सल्ला देणं, जरूर तेथे मदत करणं हा त्याचा सहज स्वभाव होता. आणि त्यातून तो कुणावर काही उपकार करतो आहे असं ही कधी भासवत नसे. क्लबमध्ये अनेक जबाबदाऱ्या त्यानं समर्थपणे सांभाळल्या.

 

असा हा राजबिंडा,  हसरा, उत्साही, बोलका असा हा आपला जवळचा मित्र आता आपल्याला कधी भेटणार नाही याचं दुःख कायम जाणवत राहील.

 

शेवटपर्यंत दीपा विनयबरोबर खंबीरपणे उभी राहिली. गेली काही वर्षे तिच्यावर एकामागून एक समस्यांचे डोंगर कोसळत होते. विनयच्या प्रकृतीबरोबरच तिच्या आईवडिलांची आणि विनयच्या आईचीही प्रकृती साथ देत नव्हती. सगळ्या आघाड्यांवर ती एकटी लढत होती. सगळ्यांची काळजी घेत होती. अर्थात मुलगी राधिका आणि जावई मुकुल यांची साथ तिला होतीच. पण एकामागोमाग एक अगदी जवळची माणसं गमावणे हे किती वेदनादायक आहे हे आपण समजू शकतो. या सर्व दुर्घटना दीपानं ज्या धीरोदात्तपणे झेलल्या त्याला तोड नाही.

 

विनय मातृभक्त होता. शेवटपर्यंत त्यानं आईची सेवा केली. तो जायच्या सहा दिवस आधीच त्याच्या आईचं निधन झालं. आईची साथ विनयनं केवळ शेवटपर्यंतच नाही तर त्यानंतरही निभावली.

 

या जन्मात निर्माण झालेले ऋणानुबंध पुढील जन्मात फलद्रूप होतात असे म्हणतात. नक्कीच आपल्या सर्वांना विनयची मैत्रीपूर्ण साथ पुढच्या जन्मात मिळेल असा विश्वास वाटतो.

 

विनय जाऊन आज दहा दिवस झाले. भारतीय मान्यतेनुसार आज जीवात्मा भूलोक सोडून परलोक प्रवासास निघतो. त्याला आज तिलांजली देऊन निरोप देण्याचा प्रघात आहे. 

 

"आपल्या विनयला ईश्र्वर सद्गती देवो" अशी परमात्म्याच्या चरणी नम्र विनंती करून आपल्या शिवाजीनगर रोटरी क्लबच्या परिवाराकडून साश्रु नयनांनी वाहिलेली ही शब्दांची, छायाचित्रांची, दृकश्राव्य फितींची सविनय भावपूर्ण श्रद्धांजली..... "विनयांजली"...

पुश टीम

दि. १३  सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या श्रद्धांजली सभेचा वृत्तांत   

दिनांक 13 सप्टेंबरची सकाळ उजाडली तीच विनय गेल्याच्या अकल्पित आणि धक्कादायक बातमीने.

सोमवार 13 सप्टेंबरचा पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करून त्या दिवशी विनय साठी शोकसभा घ्यावी लागली. या धक्क्यातून अजून सर्वजण सावरले नव्हते. अनेकांना अश्रू आवरत नव्हते.

 

पण तरीही बऱ्याच जणांनी आपल्या भावनांना वाट करून दिली.

श्रद्धांजली 
 

विनय हा नावाप्रमाणेच अत्यंत विनम्र आणि सर्वांचा लाडका मित्र होता. त्याच्या आठवणी बऱ्याच जणांनी सांगितल्या तरीसुद्धा अनेकांना अजून  सांगायच्या राहिल्या असणार. मी एकदोन आठवणी सांगणार आहे. त्याचा एक गुण म्हणजे अगदी साध्या गोष्टींसाठी मित्रांचे  भरभरून कौतुक करणे.


एकदा संध्याकाळी दीपा आणि विनय युनिव्हर्सिटीत फिरायला चालले होते आणि काहीतरी निरोप देण्यासाठी म्हणून घरी आले. तेव्हा मी कच्च्या केळ्याचे काप करत होते. विनयला म्हटलं गरम-गरम देऊ का खायला, तर काही आढेवेढे न घेता लगेच हो म्हणाला आणि त्याला ते काप इतके आवडले की पुन्हा कधी विषय निघाला की आवर्जून त्याबद्दल बोलायचा. २००७-०८ म्हणजे डॉक्टर राव प्रेसिडेंट असताना विनयच्या फार्महाऊसवर बावर्ची नार्ईट केली होती आणि दिपा व विनयने त्यासाठी खूप श्रम घेतले होते. सर्वांनी आमरस पोळीचा भरपूर आनंद घेतला आणि पोळ्या संपल्या. त्यांच्या कँटीनमधून आणलेल्या पण संपल्या. मग दीपाकडे जेवढी कणिक होती त्याच्या गरम गरम पोळ्या मी लाटल्या आणि सगळ्यांना वाढल्या. नको नको म्हणत असताना सुध्दा विनय जेवायचा थांबला होता शेवटपर्यंत. त्यामुळे त्यालाही त्या गरम गरम पोळ्या मिळाल्या आणि खूप आवडल्या.  तो नंतर विषय निघाला की कौतुक करून सांगायचा. अजून एक आठवण सांगायची म्हणजे २०११-१२ मध्ये जेव्हा विनय प्रेसिडेंट होता तेव्हा आम्ही जर्मनीला गेलो होतो. सप्टेंबर-ऑक्टोबर असेल. आणि काही कारणाने डॉक्टर राव माझ्या अगोदर दहा-पंधरा दिवस आधी आले होते . त्यांना बरं वाटत नव्हतं म्हणून सिटीस्कॅन करायला सांगितला होता. त्यासाठी सुरुवातीला जे इंजेक्शन दिलं होतं त्याची ऍलर्जी त्यांना आली होती. आणि त्यामुळे ते त्या दिवशी होणाऱ्या BODला पण जाऊ शकले नव्हते. हे मला काहीच माहीत नव्हतं आणि आम्ही जर्मनीहून त्यांना सुमारे चार तास फोन करायचा प्रयत्न करत होतो. पण उत्तर येत नव्हतं म्हणून मी विनयला फोन केला, "का  रे! आज BODला आले होते का डाॅ राव?" विनय म्हणाला, "त्यांना बरं नाही असं फक्त निरोप त्यांनी दिला. म्हणून ते आले नाहीत." मला जास्तच काळजी वाटली. म्हणून मी विनयला विनंती केली, "तू प्लीज जाऊन बघशील का घरी?" त्याक्षणी तर रात्रीचे अकरा वाजले होते. तरी दिपा आणि विनय यांनी आमच्या घरी जाऊन डॉक्टरांची खुशाली पाहिली आणि आम्हाला कळवली. इतर कोणाला कदाचित सांगायचं धाडस मी हे केलं नसतं. पण विनय इतका सगळ्यांना मदत करणारा होता म्हणूनच ते त्याला सांगितलं. माझ्या इंटरनॅशनल achievement बद्दल विनयला खूप कौतुक होतं. खूपच उमदं आणि एक दिलदार व्यक्तिमत्व पडद्याआड गेलं. पण मला वाटत नाही की आपल्यापैकी कोणीही त्यांला कधीही विसरू शकेल. विनयला भावपूर्ण श्रद्धांजली आणि देवाजवळ एवढीच प्रार्थना करते की दीपा आणि तिच्या मुलीला हे दुःख झेलण्यासाठी देव भरपूर सामर्थ्य देवो.

रो. शोभा राव

विनय - एक हक्काचा मित्र

तसं पाहिलं तर विनय प्रेसिडेंट असतानाच्या वर्षात माझ्या तीन मीटिंग पूर्ण झाल्या. मात्र वर्ष संपत असल्यामुळे माझं रोटरीमध्ये इंडक्शन मात्र शेखरच्या वर्षात झालं. मला अजूनही आठवते ती पहिली मीटिंग. जेव्हा मी आणि अंजली क्लबमध्ये आलो आणि एक अत्यंत हसरा आणि तेवढाच राजबिंडा चेहरा इतक्या आपुलकीने पटकन समोर आला. स्वतःची ओळख करून दिली आणि ते सुद्धा आधी मला माझ्या नावाने हाक मारून. हा इतका सुखद अनुभव होता की जो मनावर एक वेगळा ठसा उमटवून गेला. हा राजकुमार पहिल्या भेटीत मन जिंकून गेला. इंडक्शन नंतर प्रत्येक मिटींगला आवर्जून बोलणारा आणि त्याचबरोबर बाकी रोटेरियन बरोबर ओळख करून देणारा असा हा विनय. दीपा, तुझ्या बद्दल तर काय काय बोलू याला शब्दच कमी आहेत. अशा या विनय आणि दीपा या एका देखण्या जोडप्याबरोबर मैत्री कधी झाली हे कळलेच नाही. मी आणि अंजली खूप वेळेला कमला नेहरू पार्कमध्ये फिरायला जायचो आणि आमची दोघांची नजर हे जोडपं दिसतय का हे शोधत राहायची. बहुसंख्य वेळेला विनय नक्की भेटायचा आणि मग चकरा मारता मारता इतक्या मनसोक्त गप्पा व्हायच्या की त्या विसरणं शक्य नाही. स्नेहबंध कॉन्फरन्स नंतर ब्रह्मगिरीच्या ट्रीपला हे जोडपं होतं आणि मला अजून विनयचा तो निरागस चेहरा आठवतो जो आंब्याचा रस ओरपताना त्याला झालेला आनंद व्यक्त करत होता. गौरीच्या वर्षात पहिल्यांदा मी युथ डायरेक्टर जबाबदारी घेतली आणि मला माहिती देणाऱ्या हक्काच्या काही ठिकाण मधलं एक म्हणजे विनय. न कंटाळता, सगळ्या शंकांना शांतपणे उत्तर देणारा आणि त्याच बरोबर पूर्वग्रहदूषित करेल असं मत न देणारा विनय. त्याच्या खांद्यावर विश्वासाने मान ठेवली की चिंताच नाही काही. नंतर अनेक प्रसंग असे आले की ज्यामुळे विनय बरोबरचे मैत्रीचे नाते अजून घट्ट झाले. त्याच्या फार्महाऊसवर केलेली धमाल विसरणे अशक्य. अगदी अलीकडे त्याला प्लेटलेट्सची गरज होती, माझ्या पुतण्याने त्याचा ब्लड ग्रुप जमतोय म्हंटल्यावर लगेच दिल्या. दवाखान्यात असताना सुद्धा विनयने त्याबद्दल मला थँक्स देण्याकरता मेसेज पाठवला आणि व्हाट्सअप कॉल पण केला. याला मनाचा मोठेपणा म्हणायचा का साधेपणा म्हणायचा ! शब्दच अपुरे पडतील. कमला नेहरू पार्कमध्ये पायी हिंडता हिंडता रोटरीचा एन्सायक्लोपीडिया विनय कडून न मागता मिळायचा. रोटरी मध्ये नंतरच्या काही वेगवेगळ्या avenue मधल्या  जबाबदाऱ्या ज्या मित्रांच्या सततच्या पाठिंब्याने यशस्वीपणे पार पाडल्या त्या मित्रांपैकी हा मित्र विनय. नियती कधीकधी खूप वाईट खेळ खेळते पण विनयच्या बाबतीत एव्हढा वाईट खेळ खेळेल असं कधी वाटलंच नव्हतं. लिहायचं म्हटलं तर खूप काही लिहिता येणार आहे पण म्हणतात ना कधीकधी शब्द अपुरे पडतात तसंच काहीतरी आज झालय. एक माझा राजबिंडा, देखणा, निर्मळ मनाचा मित्र मात्र आज गमावला हे कटू सत्य आज स्वीकारावे लागत आहे आणि हे एक न भरून निघणारे नुकसान आहे. मनाच्या कोपऱ्यात एक कप्पा या मित्राच्या आठवणीने  सतत भरलेला असणार आहे आणि शेजारच्या मित्रांच्या कप्प्यापैकी एक कायमचा रिकामा राहणार आहे हे सत्य स्वीकारणे खूप जड जाणार आहे. इलाज नाही, ईश्वरी इच्छे पुढे मान झुकवली पाहिजे. या सगळ्यांमध्ये दीपाच्या धैर्याला सलाम केल्याशिवाय विनयची श्रद्धांजली पूर्णच होऊ शकत नाही. दिपा आणि राधिकाला हा आघात सहन करायची शक्ती मिळो हीच परमेश्वराकडे प्रार्थना.

रो. अजय गोडबोले

हा हा हा…
 

हा ! हा !! हा !!! असं मोठ्याने हसण्याचा आवाज ऐकू आला की, आपण समजावं, विनय आला !

तो मला नक्की कधी भेटला आणि कधी मित्र झाला हे आता आठवत नाही ! पण मी त्याला मदत मागितली आणि त्यांने हो म्हटलं.

त्यावेळी त्याने आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू केला होता आणि जास्त वेळ देता येणार नाही हे आधीच सांगितलं. तो माझ्याबरोबर जमेल तेव्हा प्रोजेक्टसाठी येत असे. परंतु येतो म्हटल्यावर येईलंच असं नसायचं. खूपदा यायचा तो ! परंतु तो जेंव्हा येत नसे तेव्हा त्याला फोन करून विचारायचो, आणि तो एकदम हा हा हा ….विसरलो…!! असं म्हणून दिलखुलास हसायचा !

त्याच्या त्या निरागस हसण्यामुळे मी त्याच्यावरती रागावलो आहे हेच विसरून जात असे ! त्याच्या उत्साहाच्या कहाण्या आपल्या क्लबमध्ये सर्वांनाच माहीत आहेत !


त्याचा फार्म हाऊस असेल किंवा त्याच्या फार्म हाऊस वरची, ‘बाबर्ची नाईट’ असेल किंवा एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घेणे असेल, प्रत्येक वेळी तो पुढाकार घेऊन त्यामध्ये आपले योगदान देत असे ! मध्यंतरात काही कारणांमुळे खूप लोकांशी माझा संपर्क कमी झाला. एके दिवशी मला कळलं की विनयची प्रकृती बरी नसते !


नंतर कळलं त्याला पोटाचा त्रास आहे, आणि कोणीतरी शरीराचा भाग देणगी म्हणून दिल्याशिवाय त्याचं कार्य होणार नाही. अधून मधून तो क्लबला येत असे आणि नंतर कळलं की त्याचं एके दिवशी ऑपरेशन झालं.आणि कळलं कीं तें यशस्वी पण झालं ! त्याच सुमारास त्याचा वाढदिवस होता आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून एक निरोप दिला! त्याला म्हटलं मी, की, तुला सर्वोत्कृष्ट बर्थ डे प्रेझेंट मिळाले आहे त्यामुळे ह्याच्यापेक्षा जास्त कोणी काही देऊ शकत नाही !

त्यानंतर परत काही दिवसांनी तो क्लब मध्ये आला आणि त्याच्याकडे बघून सकारात्मक असणे म्हणजे काय याचा प्रत्यय आला !

जेव्हा कधी तो मला भेटेल, तेव्हा मी त्याला विचारणार आहे ….का रे बाबा… सांगूनही येत नाही, हे मी समजू शकतो, पण, ….तू असं न सांगता कसा जातोस ?

त्यावर तो आपल्या निरागस आणि खळखळून स्वच्छ आवाजात गडगडून हसेल आणि मोठ्ठया आवाजात म्हणेल….


"हा ! हा !! हा !!! विसरलोच !!"

 

रो. उदय चिपलकट्टी

ever smiling.jpg

निःशब्द


आज कितीही निःशब्द वाटत असलं, कोणाशी काही बोलू नये असं वाटत असलं तरी मन मनाशीच खूप बोलतंय. काही वेळा आठवणीच तुम्हांला मूक बनवतात आणि कितीतरी वेळ मी कोणाशी बोलत नसले तरी खूप बोलतीये असं वाटू लागलंय. सकाळपासून एक उदास निराश भावना मनात दाटून आली आहे...

28 मे 2012 रोजी मी RCPS ची सभासद झाले त्या वेळी नितीन अभ्यंकर अध्यक्ष होता आणि पुढील वर्षी म्हणजे 1 जुलै 2012 पासून विनय अध्यक्ष होणार होता. जेव्हा जेव्हा मी guest म्हणून मीटिंग ला यायची, तेव्हा प्रत्येक वेळी आवर्जून fellowship च्या वेळी तो गप्पा मारायला यायचा. अनेक कॉमन ओळखीच्या व्यक्तींबद्दल चर्चा व्हायची. इतकंच नव्हे तर क्लब मध्ये येऊन तुला आवडेल ते काम कर असा सल्ला ही दिला. या सल्ल्याने अर्थातच एक comfort level आली आणि प्रेसिडेंट या व्यक्ती बद्दल माझ्या डोळ्यासमोर जी प्रतिमा होती ती थोडी सौम्य झाली. प्रेसिडेंट झाल्यावर विनयने त्याचं ते वाक्य खरं ही केलं आणि मला क्लब एकांकिका निमंत्रक हे पद देऊ केलं.. माझं आवडतं काम. त्या वर्षी क्लबला, मला, अनेकांना आपल्या क्लब च्या एकांकिकेत बक्षीसं ही मिळाली आणि विनय कडून शाबासकीची थाप देखील.. अनेकदा घरी यायला उशीर व्हायचा तेव्हा विनय "तू एकटी जाऊ नकोस आम्ही तुला घरी सोडतो " असे म्हणून सोसायटीच्या गेट पर्यंत नव्हे, तर घरी येऊन बाबांशी बोलून, त्यांची चौकशी करून आणि माझं मनसोक्त कौतुक बाबांना सांगून मगच घरी जायचा. कॉफी प्यायला पण कधी थांबला नाही.

मला मेडिकल ऍवेन्यूत काम करायला आवडतय हे कळल्यावर आवर्जून फ़ोन करून, आपण दीनानाथमध्ये अमुक प्रोजेक्ट करतोय, रत्नामध्ये अमुक मेडिकल प्रोजेक्ट करतोय अश्या स्वरूपाच्या प्रोजेक्ट्ससाठी बोलवायचा. यामध्ये माझी आवड लक्षात ठेवण्याचा भाग जास्त होता, नाहीतर माझ्यासारख्याना मेडिकलमधलं 'ओ' का 'ठो' कळत नसलेल्या आणि जुनिअर सभासदाला कोण कशाला आवर्जून बोलवेल? मैत्रीची भावना आणि संवेदनशीलता जास्त होती यांत...

 

मंजिरीने लिहिलेल्या "ऐसी भी बाते होती है" या एकांकिकेत मी काम करत नव्हते. मला वाटतं 2016/17 कुठलं तरी वर्ष असावं. एक दिवस फ़ोन करून म्हणाला "मी हिरो झालोय खरा, पण प्रॅक्टिस च्या वेळी झीरो असतो. मला माझा रोल परफेक्ट करण्यासाठी मदत करशील का प्लिज?" मी म्हणाले, "प्रयत्न करूया." आमची दुपारी 3 ची वेळ नक्की ठरली. त्या एकांकिकेचं स्क्रिप्ट झेरॉक्स करून त्याने मला आणून दिलं आणि म्हणाला हे तुझ्या जवळच ठेव. रोज तासभर माझी प्रॅक्टिस घे". सुमारे 6/7 दिवस तो रोज एक तास घरी यायचा आणि मी त्याचे संवाद म्हणून घ्यायची. रोज न चुकता मला बजावायचा, कोणाला सांगू नकोस तू माझी डायरेक्टर आहेस. मीही दिलेला शब्द पाळला. मी भाग "न " घेतलेल्या त्या एकांकिकेचं स्क्रिप्ट अजूनही माझ्याकडे आहे.

स्नेह्बंध कॉन्फरन्सला पनवेलला गेलो असताना आमचं डिस्ट्रिकट कॉन्फरन्सचं सादरीकरण इतकं अप्रतिम झालं होतं की सर्वजण आमची तारीफ करत होते. विनय आणि मी उभे असताना "काय पेशवे" अशी हाक ऐकू आल्याबरोबर विनय त्याला म्हणाला, "आम्ही नुसतेच पेशवे, श्रीमंतीचा रुबाब मिरवला. पण या रमाबाई रानडे पहा, स्त्री शिक्षणाचा पाया घालून केवढं मोठं समाजकार्य केलंय". आपल्या गप्पांत उपस्थितांना सामील करून घेण्याचं हे विनयचं कौशल्य वाखाणण्यासारखं होतं.

क्लब मधल्या प्रत्येकाशीच विनयचे जुळलेले हे बंध असेच घट्ट राहणार आहेत. विनय, तू जिथे आहेस तिथे नक्की सुखात आहेस. कारण कितीही दुःख, संकट आली आणि भोगावी लागली तरी सदा हसतमुख असणारा विनय दुःखी असूच शकत नाही.


दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा

भावपूर्ण श्रद्धांजली

रो. अश्विनी अंबिके 

हसरा विनय


विनय म्हटले की विनयचा हसरा चेहरा डोळ्यासमोर येतो .आजही तो आपल्यात नाही हे सत्य पचविणे जड जात आहे. विनय सर्वांना मदतीसाठी सतत पुढे धावणारा , उत्साही होता.
       

विनय अध्यक्ष असताना त्याने माझ्यावर 'पुश 'ची जबाबदारी दिली होती. तो कधीही माझ्या कामात ढवळाढवळ करीत नसे. परंतु नवीन नवीन कल्पना मात्र सुचवीत असे. त्यावर्षी पुश चे काम करताना खूप मजा आली होती.


आनंद नवाथे यांच्या अध्यक्षीय वर्षात क्लबडेसाठी मी 'गुरुबळ 'हे नाटक लिहिले आणि दिग्दर्शित केले. त्यात मला एक जोडपे हवे होते. माझ्या डोळ्यासमोर पटकन विनय-दीपाच आले. दीपाने त्यापूर्वी कधीही रोटरीच्या नाटकात काम केले नव्हते. पण माझ्या आग्रहाखातर ती तयार झाली. विनय तर तयारच होता. दोघांनीही छान कामे केली आणि एकूणच तो प्रयोग रंगला. त्यावेळी विनय तालमीच्या वेळी मला अभिनय, देहबोली, संवादफेक या विषयी सतत विचारीत असे आणि आपल्या कामात सतत सुधारणा करीत असे.
     

विनयच्या आजाराविषयी कळले तेव्हा धक्का बसला होता. पुढे लिव्हर ट्रान्सप्लांट साठी प्रयत्न होत आहे हे कळले. मी 'खिंडीतील गणपती 'येथे हेरिटेज वॉक काढला, त्या दिवशी दीपा आली होती. वॉक झाल्या बरोबर दीपाला लिव्हर मिळाल्याचा फोन आला. खिंडीतील गणपती तुला पावला ग, असे मी तिला म्हटले आणि तिने दुजोरा दिला. त्यानंतर व्यवस्थित ऑपरेशन झाले आणि विनय पुन्हा रोटरीत येऊ लागला तेव्हा छान वाटले. माझ्या हेरिटेज कट्ट्यावर त्याची उपस्थिती अग्रक्रमाने असायची शिवाय सेशन संपल्यावर तो चर्चा करायचा ,अनेक प्रश्न विचारायचा आणि मला म्हणायचा 'प्रतिमा ,तुझा सेशन संपूच नये असे वाटते .तू सतत बोलत राहावे आणि आम्ही ऐकत राहावे असे वाटते.' आता हेरिटेज कट्ट्यावर विनय नसणार, पण त्याची आठवण मात्र सतत येत राहणार. 'हेरिटेज कट्टा' वरील तुझे सेशन इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करून ते पुढील पिढीसाठी तू दाखव ,अशी कल्पनाही त्याने मला बोलून दाखविली. सतत नवीन कल्पनांचा वेध घेणे हा त्याचा स्थायीभाव होता.
   

दीपाने या सर्व काळात दाखविलेला संयम आणि धाडस खरोखर कौतुकास्पद आहे. दीपा आम्ही सर्वजण तुझ्या दुःखात सहभागी आहोत. आता काळच या दुःखाची धार कमी करेल.


ओम शांति | शांति| शांति |


एन. प्रतिमा दुरुगकर

WhatsApp Image 2021-09-22 at 9.23.05 AM.jpeg

विनय साठे एक अवलिया मित्र

 

"जिंदगी बडी होनी चाहिये लंबी नही"  हा आनंद मधील संवाद विनयच्या बाबतीत चपखल फिट होतो. रोटरीमध्ये यायच्या आधी समव्यावसायिक म्हणून कॉम्पुटर सोसायटी ऑफ इंडियाच्या काही कार्यक्रमात विनयची प्रथम भेट झाली. त्यावेळी मी त्याला राजबिंडे व्यक्तिमत्व बघून "आयटी इंडस्ट्री मधील ऋत्तीक रोशन" असेही चिडवत होते. यथावकाश तो रोटेरिअन झाला  व हळू हळू त्याच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडत गेले. बरेचवेळा आम्ही सकाळी टेकडीवर फिरायला भेटायचो. कधी कधी चहा गप्पा. अशाच एका न्याहरीत आम्हाला मोबाईल फोनवर मराठीत पुस्तक लिहायची कल्पना सुचली. तत्काळ ती उत्कर्ष प्रकाशनने मान्य केली. "मोबाईल माझा सोबती" हे असे मराठीतलं प्रथम पुस्तक जन्माला आलं. त्याकाळी विनयची माझी खरी मैत्री झाली. मी प्रांतपाल असताना त्याने अनेक प्रकारे मदत केली.  निस्वार्थी, निखळ, निर्व्याज मित्रापुढे आता "कै." लावावे लागणार हे वास्तव आता पचवायला अवघड जाणार आहे.

डॉ. दीपक शिकारपूर

विनय - एक भला माणूस !


रोटरी क्लब किंवा इतरत्र सुद्धा , आपलं कोणाशी चांगलं जमेल आणि कोणाशी नाही याचा पटकन अंदाज येत नाही . विनय आपल्या क्लब मध्ये १९९७ साली आला. तसा तो माझ्यापेक्षा वयाने बराच लहान पण त्या उमद्या आणि सदैव हसतमुख असणाऱ्या विनयशी माझे सूर पटकन जुळले. सर्व विषयात रुची असणारा, कायम सकारात्मक विचार करणारा आणि कसलीही मदत करण्यास सदैव तत्पर असणारा विनय चांगला मित्र झाला . खरंतर आमच्या गाठीभेटी क्लबपेक्षा क्लबच्या बाहेरच जास्त व्हायच्या. माझ्या प्रेसिडेंटशिपच्या वर्षात त्याची मला भरपूर मदत झाली. 'सिम्बॉयोसिस'चे डॉक्टर एस. बी. मुजुमदार यांना त्यावर्षी आपल्या क्लबचे ऑनररी मेंबर करण्यामध्ये त्याचं मोठं योगदान होतं. मदतीला धावून जाणं हा त्याचा मोठा गुण होता. आपल्या कर्तृत्वाने यथावकाश तो क्लबचा प्रेसिडेंट झाला. त्याने त्यावर्षी चमकदार कामगिरी केलीच शिवाय नंतर  डिस्ट्रिक्टमध्ये विविध पदांवर चांगलं काम केलं. त्याचं ऑफिस आणि माझं घर अगदी जवळ असल्याने कंप्युटरची कुठलीही अडचण आल्यास मी त्याला हक्काने फोन करायचो आणि तोही तत्परतेने लगेच यायचा किंवा त्याचा इंजिनिअर तरी पाठवायचा. आणि हे सर्व तो निर्व्याज मनाने  करायचा. प्रभात रोड वरच्या वॉकिंग ट्रॅक वर आमच्या वरचेवर गाठीभेटी व्हायच्या. नंतरच्या काळात त्याच्या तब्येतीच्या अडचणी उद्बभवल्या नसत्या तर क्लबमध्ये तसेच डिस्ट्रिक्टमध्ये त्याचं भवितव्य उज्वल होतं. त्यातून तो थोडासा सावरल्यावर जेव्हा आमच्या ट्रॅक वर भेटी व्हायच्या त्यावेळी तो मी आता सायकलिंग करतो कधीतरी टेकडीवर जातो हे सांगायचा तेव्हा मला त्याचं कौतुक आणि अचंबा वाटायचा . 


त्यामुळे मला हा लवकरच पूर्णपणे बरा होऊन क्लबमध्ये नियमित यायला लागेल असं वाटायचं . पण तसं व्हायचं नव्हतं हेच खरं . आता आपण एक तरुण आणि उत्साही मित्र गमावला याची रुखरुख सदैव राहील .

रो. यशवंत गोखले

Softspin office 1.jpg

An Ever-Smiling Friend

As I am writing about memories and impressions about Vinay, first thing that flashes in my mind is, his smiling face and aura of assurance of a person who has genuine intentions to help you.


In 2006-07 , we worked professionally together and interactions brought us together more closer than before. Our discussions used to be varied often mix of technology related to work, Marathi literature and about practical spirituality taught by my Guru. It prompted him to join our first padyatra to kolhapur. He joined somewhere after shirval and spent a day in walking with us and stayed overnight just like all of us in some shelter. He was very happy to experience abundance of energetic feeling and no pain in his leg. I am sure the spiritual energy received during that walk will accompany him in his afterlife now.


There was a nice mix of give and take of thoughts and insights of our individual experiences. It has certainly enriched my life.
 

Life is a flow and some people meet and life flows together for a while and then the flows can separate. I will miss him and it pains me that I won't be meeting him now , however , I will hold on to joy of nice memories of time we had together.
 

I am sure whichever spiritual plane he will transit to now, he will be smiling as usual.

Rtn. Rahul Pendharkar

विनय, एक नावा प्रमाणेच व्यक्ती

विनय, नावाप्रमाणेच स्वभाव असणारी एक विलक्षण व्यक्ती. माझा परिचय हा - एक रोटेरीयन व एक फॅमिली फ्रेंड म्हणून सुद्धा झाला. पण त्याहून अधिक एक जगन्मित्र म्हणून त्याचा खरा परिचय. प्रत्येक अडी-अडचणीला विनय हा दत्त म्हणून उभा रहायचा. त्याचा  हसरा चेहरा पाहिला कि अर्धा प्रॉब्लेम संपत असे.


अशा विनयने, मी जेव्हा club president झालो तेव्हां,'this will be like my own year' आसे म्हणून झटून माझ्या बरोबर काम केलं. Peace symposium चे convenor पद हे त्याच्याकडे होते आणी त्याच दरम्यान त्याच्या तब्बेतीची बातमी आली. Duty first ह्या ब्रीद वाक्याप्रमाणे त्याने तो कार्यभार समर्थपणे पेलला.


विनय ज्या दिवशी गेला  त्या दिवशी, त्याच्या घरी आदरांजली वहायला बरेच सदस्य आले. तेव्हा मी त्याच्या study table पाशी बसलो तर त्याच्या वर rotary logo अजून तसाच लावलेला होता. मी मनाशी म्हणालो कि विनयचा रोटरी  wheel आता कायमचा थांबला. तेव्हा मला फटका लागल्या सारखे शब्द आठवले :

अरे अटकन पटकन घडेल झटकन,

सरेल सर्व काही |

दोन क्षणाला थांबतील जन

जग चालू राही ||


केले जे जे कुणी न नेले

सच आहे भाई |

वेल स्मृतींचा सोडूनी जाई

 हरदम तो राही ||


अश्या प्रकारे विनयच्या स्मृती हरदम आपल्यात राहतील याची खात्री ठेवतो व आदरांजली पुन: वाहतो.

नमस्कार

रो. प्रदीप वाघ

Picture7.jpg

राहिल्या त्या आठवणी.... 

कितीतरी रोटरी प्रोजेक्टमध्ये विनय दीपाचा सहभाग असायचा. कधी ते दोघे आमच्या गाडीतून तर कधी आम्ही त्यांच्या गाडीतून जायचो. पिकनिक, वृक्षारोपण, बावर्ची नाईट, क्लब डे, एकांकिका प्रॅक्टिस किती वेळा हेल्दी रिलेशन होतं त्या दोघांचं सर्वांशी.


मागे एका वर्षी शिरीष मंजूच्या फार्महाऊस वर बावर्ची नाईट झाली होती. त्यावेळी रात्री परत घरी येण्यापेक्षा विनयच्या फार्महाऊसवर राहायचे आम्ही काही जणांनी ठरवले. विनय-दीपाने छान बडदास्त ठेवली आमची. रात्री गच्चीवर गाद्या घालून चांदणं पांघरून गप्पा गोष्टी करत धमाल आली. इतकं चांदण्यांनी खचाखच भरलेलं आकाश मी प्रथमच पाहिले.
             

एकांकिका स्पर्धेच्या वेळी गाडी पार्कींगच्या प्रॉब्लेममुळे आम्ही बऱ्याचदा  मिळून जायचो. एका रात्री येताना खूप पाऊस पडत होता. गुरु ऑफिस टूरला गेल्याने मला घरी सोडायला विनय दीपा आले. गेट मध्येच सोडून न जाता विनय मला म्हणाला की "तू घरात गेलीस की दिवा चालू बंद करून सांग. मगच आम्ही जातो". यापूर्वीही मी ज्यांच्याबरोबर आले त्यांनी अशीच आपुलकीची वागणूक मला दिली होती, त्याच चांगुलपणाचा अनुभव मला आला.
             

बावर्ची नाईटला विनयने एकदा 'बासा' फिश फ्राय मस्त केला होता. त्याची चव अजूनही आठवते. विनय-दीपाला कयानी केक कॉफीत बुडवून खायला खूप आवडायचा. मागच्या वर्षी क्लब डे ला कपल-डान्स मध्ये विनय दीपाचा सहभाग होता. मजा यायची सगळ्यांबरोबर प्रॅक्टिस करायला. मागे अशा कितीतरी क्लबडेच्या डान्स प्रॅक्टिसेस त्यांच्या घराच्या गच्चीवर झाल्या आहेत याची आठवण आली. आम्हा सगळ्यांना तो मोठ्या सर्जरीतून पूर्णपणे बरा झाल्याचा आनंद झाला होता.
             

गोव्याला जाऊन आल्यावर तो खुश होता. मीटिंगच्या आधीच्या गप्पांच्या वेळात झूम मीटिंगमध्ये छान प्रवास वर्णन केलं होतं त्यानं. खूप आठवणी आहेत अशा........

ओम शांती
 

ऍन. रोहिणी पालेकर

WhatsApp Image 2021-09-21 at 5.56.31 PM.jpeg
WhatsApp Image 2021-09-21 at 5.56.32 PM.jpeg
WhatsApp Image 2021-09-21 at 5.56.32 PM (1).jpeg

आठवणींच्या साठवणीतला विनय

सतत हसतमुख, प्रत्येकाशी आपणहून बोलणारा, नावाला शोभेल असा विनम्र, प्रत्येकाला मदतीचा हात देणारा आणि नायगऱ्याला लाजवेल असा खळखळता उत्साह असणारा आणि त्यामुळे सर्वांना हवाहवासा वाटणारा हा तारा आज निखळला आहे. विनय सर्वांना चटका लावून गेला आणि प्रत्येक जण हळहळला. त्याने 'मरावे परी किर्ती रुपी उरावे' हे अगदी सार्थ ठरविले. आपल्या मरण्याने जर कुणाच्या डोळ्यात अश्रू आले नाही तर ते मरण व्यर्थ असते असे म्हणतात.

विनय, आज तुझ्यासाठी प्रत्येकजण रडतो आहे.


प्रत्येकाला पहिल्या भेटीतच आपलेसे करून घेण्याची कला तुझ्याकडे होती,त्यामुळे driver पासून watchman, रिक्षावालापर्यंत प्रत्येकाला तू आनंद द्यायचास. तुझ्या सहवासात प्रत्येकजण अतिशय comfortable असायचा. तुझ्या ह्या स्वभावामुळे तुझा मित्रपरिवार खूप मोठा होता.
 

तुझ्या आठवणीत भूतकाळात गेले आणि मन दाटून आले. आज तुझ्या आठवणी लिहिण्याची वेळ यावी हे माझे दुर्भाग्य. तू आणि विकास प्राजमध्ये असल्यापासून आपली मैत्री झाली. घरी येणे-जाणे वाढले, नकळत घरोबा वाढला. मुलींना घेऊन कमला नेहरू पार्क मध्ये भेटायचो, week end ला long drive ला जायचो, सकाळी टेकडी चढायला जायचो, रात्री बॅडमिंटन खेळायचो आणि मग 'मयूर पावभाजी' मध्ये आपल्या सर्वांची आवडती expresso coffee घेत तासन तास गप्पा मारायचो, किती सुंदर दिवस होते.

तुझ्या बद्दलच्या आठवणी कुठल्या आणि किती लिहू. प्राजपासून ते softspin पर्यंतचा प्रवास खूप जवळून बघितला. business मधील चढउतार सोबत अनुभवले. जिद्द आणि चिकाटीने संकटांना सामोरे जाण्याची कला तुझ्याकडूनच शिकले. तुझा सकारात्मक विचार कायम मनाला उभारी द्यायचा. माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीतील सुप्त गुण ओळखून आणि त्यावर विश्वास ठेवून तू मला softspin मध्ये पार्टनर केले, आत्मविश्वास दिला, हे मी कधीच विसरणार नाही. हे तू फक्त माझ्याच बाबतीत केले असे नाही तर सॉफ्टस्पिनमधील इतर स्टाफच्या बाबतीत देखील तुझा हाच दृष्टिकोन होता. त्यामुळे विनय सर  सर्वांचे लाडके होते. सॉफ्टस्पिन मधून गेलेली सर्व मुलंमुली नक्कीच तुझे नाव काढत असतील. स्वतःला दिवस रात्र कामामध्ये झोकून द्यायचा, एखादी गोष्ट हाती घेतली की त्याचा सखोल अभ्यास करायचा. मला आठवते सॉफ्टस्पिन सुरू केली तेंव्हा काहीतरी आतंरराष्ट्रीय व्यवसाय करायचे तुझ्या मनात होते. त्यासाठी सर्वात आधी इंटरनेट connection घेतले, पुण्यातल्या पहिल्या 7-8 लोकांमध्ये आपण होतो.

 

Softspin ची जेंव्हा आपण लंडन ब्रँच काढायची ठरली तेंव्हा तुझी आणि दीपाची पहिली लंडन visit आठवली. किती धमाल केली होती आपण. लंडन मध्ये फिरत असताना अचानक सौरभ गांगुलीची भेट झाल्याने दीपा आणि कविकाच्या चेहऱ्यावरील आनंद अजूनही आठवतो आणि तो तू कॅमेराने टिपला होता.

मला आठवते एक वर्ष पुश दिवाळी अंकासाठी 'मैत्री' असा एक विषय स्वाती क्षीरसागरने ठेवला होता त्यावेळी मी विनय बद्दलच लिहिले होते.

18 Oct 2001,नवरात्राची पहिली माळ आणि त्या दिवशी पहाटे 3 वाजता माझ्या शेजारच्या फ्लॅट मध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाला.त्याचा impact इतका प्रचंड होता की आमच्या फ्लॅटच्या संपूर्ण भिंती भुईसपाट झाल्या आणि विजेचे खांब कोसळून सगळीकडे अंधकार झाला. काही क्षण कळलेच नाही ,असे वाटले कुणीतरी बॉम्ब टाकला.

 

त्यावेळी विकास लंडनला होता. घरी विकासचे बाबा, आत्या, मी आणि कविका होतो. दोन्ही फ्लॅट ची कॉमन भिंत आमच्या बाजूला पडली आणि आत्या त्याच्याखाली दबल्या गेल्या. आमच्या कॉलनीतील सगळेजण धावून आले पण मला त्या क्षणी आठवण आली ती विनयची. पहिला फोन मी विनयला केला आणि 15व्या मिनिटाला विनय आणि दीपा मदतीस धावून आले. आत्या आणि बाबांना हॉस्पिटल मध्ये नेण्यापासून ते आम्हाला  सुरक्षित ठिकाणी हलविण्यापर्यंत आणि नंतर ही सर्व सेट होई पर्यंत विनयदीपाने खूप मदत केली आणि हे आम्ही कधीच विसरू शकणार नाही
 

विनयमुळेच आम्ही Dr राव प्रेसिडेंट असतांना RCPS जॉईन केले. आपल्या क्लब वरही त्याचे अपार प्रेम होते. प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये झोकून काम करायचा आणि क्लब बद्दल कायम कौतुकाने बोलायचा.


काल जुने अल्बम बघत असताना खूप फोटो सापडले, आपली सिहगड ट्रिप, दरवर्षी महाबळेश्वर, सासवणे, वर्षा दोन वर्षातून एक मोठी ट्रिप सगळे काही झरकन डोळ्यासमोरून गेले.खूप खूप आठवणी आहेत.
 

तुझ्या आजारपणाच्या काळात दीपाने खूप खंबीर राहून प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. गेली 3-4 वर्षे ती फक्त आणि फक्त तिचे कर्तव्य करत राहीली. Hats off to you Deepa. We are always with you.
काळ कुणासाठी थांबत नाही आणि विनय तूही आमच्यासाठी थांबला नाहीस. तुला नेहमीच घाई असायची, इथेही तू घाई केलीस.


तुझे short & sweet जीवन जगून तू पुढच्या प्रवासाला निघून गेलास. आज तुझ्या जाण्याने कधी न भरून येणारी पोकळी निर्माण झाली.
 

तुझ्या आठवणीत..


रो. कल्पना काकडे

जो आवडतो सर्वांना, तोचि आवडे देवाला

 

I always remember Vinay as a very warm and friendly  person . Always smiling,  pleasant personality and a hard core Rotarian . We joined the club in 2013. Radhika’s wedding was the first family function we were invited for. We were wondering whether it was a real invitation or just informative invitation! We consulted Anand and Jayshree and they promptly dispelled our doubts. Still, we were a bit hesitant while attending the marriage. But Vinay and Deepa were very  friendly to us and we soon became part of the gathering.

I am a regular at Vetal Tekdi. Quite a few times he met me  on tekdi.  We used to chat for some time and disperse. He wholeheartedly congratulated me   when I  won Badminton matches of our District and for my articles on Intellectual Property. He had even come to our house with his friend who wanted some guidance about patent filing.

Sharad came to know that Vinay needed some assistance in reconciling cash transactions of our club’s “Global Grant involving Swatch”. But Vinay was hesitating in asking for the same. Sharad called him and went to his residence to have a look at “EXCEL related reconciliation issues. After completing the work, Vinay showed him the room in which he had planned to isolate himself after undergoing “liver transplant” surgery. Vinay was extremely positive about undergoing surgery and bouncing back in action post surgery.

Vinay was very happy when Sharad accepted Presidentship and had offered to be part of the BOD. With a heavy heart he told us that his health may  not permit him to shoulder the responsibility but Sharad can look forward to his guidance especially in connection with Foundation.  He kept his word and used to appreciate that in spite of lockdown club was functioning well.

Sharad came to USA in April and soon we became grand parents. He congratulated us on the news and asked us to share photos and videos of our granddaughter.  He was very happy on receiving the same and liked Maya ( our grand daughter ) very much .

It is hard to believe that he is not amongst us . Many times we used to discuss about Vinay’s health and we were glad when he shared his progress on WA . We were sure that with Deepa’s rock support and hard work he will be through.  We thought that like Dr. Vinay Koparkar our Vinay would also get well soon. But it was not to be. It seems true that God likes the person whom everybody adores.

Dear Vinay, you will always be in our memories.

 

Rtn. Dr. Bharati Dole

मला भावलेला विनय

 

प्रथम ओळख 

विनयची फॅमिली व आमची ओळख ३०+ वर्ष पासून आहे. १९८९ वेळी, पुण्यातल्या एक VC start-up कंपनीत (आजची प्राज) मी जॉईन झालो. पहिल्याच आठवड्यात विनय आणि मी  साखर कारखान्याच्या नवीन प्लांटच्या भूमी-पूजन समारंभाला एकत्र गेलो. त्या प्रवासात माझी व विनयची छान ओळख झाली. (एका "जळगावी" शब्दांत मी त्याला पकडलं), आणि विचारलं, तू खानदेशात होतास का? आणि त्याच वेळी आमचं नात बदललं ते कायमस्वरूपी. पहिल्या भेटीत विनय मला त्या दिवशी त्याच्या घरी घेऊन गेला. आई, दीपा व राधिकाशी ओळख करून दिली. त्यानंतर कधी मागे वळून बघितल नाही. अगदी मोठ्या भावाप्रमाणे माझी, आमची मैत्री फुलली. आम्ही दोन्ही कुटुंब एकत्र व  Extended family कधी झालो हेही कळलं नाही. असा त्याचा लाघवी स्वभाव, जो मला प्रथम भेटीतच खूप भावला. 

 

प्राजमध्ये आम्ही दोघेही १०-१२ वर्षे एकत्र  झटून काम केले(१९८७-१९९९). मी इंजिनीरिंग प्रोजेक्ट मॅनेजमेंट व साईट कन्स्ट्रक्शन आणि विनय मटेरिअल्स मॅनेजमेंट sourcing supply बघायचा. या काळात आम्ही  दोघेही खूपदा  एकत्र/ बरोबरीने भारत व परदेशी  प्रवास  केला.


भटकंती


विनयला फिरण्याची भारी हौस. प्राजच्या कामानिमित्ताने आम्ही दोघांनी १९८८ ते १९९८ दरम्यान भारतात व बाहेर खूप प्रवास केला. मटेरियल management, international sourcing / procurement हे त्याचं विश्व. Dept १० वर्षात २ लोकांवरून १०/१२ व cumulative purchase ४५०-५०० कोटींचा घरात. पण ह्यात एका पैचासुद्धा हिशोब चुकला नाही की, कुणाला काही गडबड करता आली नाही. वेगवेगळ्या प्रकारचे Stainless स्टील, de-oxidised Copper, एक्झोटीक टायटॅनियम, Polished mirror फिनिश S Steel (फूड ग्रेड), pumps, valves, pipes अशा अनेक गोष्टींचा त्याचा अभ्यास गाढा होता. कामावरची कडक पकड, सचोटी व पारदर्शकता हे गुण मला विनयमध्ये आढळले.  बेस्ट Employee, Chairman Award असे अनेक recognitions विनयला या प्रवासात मिळाले. प्रवासात आम्ही विविध विषयांवर चर्चा करीत असू. वैचारिक गोष्टी, त्यातील विविधता, या गोष्टी विनयकडून शिकलो. एक सच्चा मित्र, निर्मळ मन असलेला विनय मी पाहिला.

कामानिमित प्रवास सोडून आम्ही दोन्ही कुटुंबाने एकत्र सहली, निसर्गरम्य ठिकाणी प्रवास खूप केला. त्यावेळी आमच्या-राधिका आणि कविका-लहान होत्या.  विनय अगदी लहान होऊन त्यांच्या कडून  वेगवेगळ्या आव्हानात्मक गोष्टी करून घेई. मग ते डोंगर वा झाडावर चढणं असो, पळणे वा animal rides असो. किंवा कोडी सोडवणं, नाटक करणं, गाणे वा डान्स असो. त्यामुळे  दोघींना विनय

बाबा / काका खूप आवडायचा.

 

फोटो काढण्याची विनायला आवड भारी, पण  झाडे, फुलं, निसर्ग यांचेच जास्त. त्यामुळे दीपाची व आमची चिडचिड व्हायची. अजून मोबाईल कॅमेरा त्यावेळी  उदयास यायचा होता.


Unplanned लॉंग ड्राईव्ह करण्याची विनयला मधून मधून हुक्की यायची. मग काय, बऱ्याचदा तो दीपासह आमचेकडे यायचा, व म्हणायचा, "चला आपण लॉंग ड्राईव्हला जाऊ या". म्हणून आम्ही दोन दिवसाची पुणे-कोकण वारी, तसेच अलिबाग-सासवणे केलेली मला आठवते. असं खूपदा महाबळेश्वरही झाले. या लॉंग drive  प्रवासात एकदम धमाल असायची. खाण-पिणं-गाणं आणि गप्पा असा भरगच्च कार्यक्रम असायचा.  कामाचा Stress कमी करण्याचा हा बहुतेक विनयचा  प्रयोग असावा..!


Softspin Company सुरुवात

विनयला नाविन्याची गोडी होती. मग ती कामाची, कामाच्या स्वरूपाची असो, की खाण्याची - फिरण्याची असो. एकदा का तोचतोचपणा  व तीच तीच गोष्ट आपण करतोय अस वाटायला लागलं की, विनय change शोधत असे. या त्याच्या स्वभावामुळे विनयने  १९९९ दरम्यान नोकरी

सोडली. आम्हा सर्वांना खूप आश्चर्य वाटलं.


यावेळी कल्पना व मी US ला २ महिन्यांसाठी गेलो होतो. परतल्यावर विनयची गाठ घेतली. विचारल्यावर तो म्हणाला, स्वतःचा business सुरू करायचा विचार करतोय. "कुठला ?" अस विचारल्यावर "अजून ठरत नाही" म्हणाला. दीपाला विचारलं तर तिलाही माहीत नाही. एक आठवड्यात विनय दीपाला घेऊन आमच्या घरी आला, व त्याने Softspin company  सुरू करणार असल्याचे idea मांडली. सॉफ्टवेअर टेस्टिंग, Training व IT recruitment services असा business propose केला. कल्पनाने पार्टनर म्हणून जॉईन व्हावं असा आग्रह धरला. त्यावेळी कल्पना कॉम्पुटर ट्रेनिंग classes घेत असे.


Softspin १९९९ सुरू केली.  विनय पुन्हा 24 X 7 कामाला लागला, अक्षरशः त्याला जेवायचं भान  नसे. काही वर्षातच सॉफ्टस्पिनने नवीन उंची गाठली. पुण्यात कंपनीचं नावं सर्वांना माहित झालं. मोबाईल क्षेत्र त्यावेळी नवीन उदयास येत होतं, आणि विनयने Softspin ला नवीन दिशा दिली, इन्व्हेस्टर  आणणे, एक्स्पर्ट औरंगाबादचा, म्हणून तेथेच त्याने Softspin मोबाइल development ब्रँच सुरू केली. अशा तऱ्हेने विनयच्या leadership ने Softspin ची पुढे वाटचाल सुरू राहिली. लगेच त्याने  Softspin  UK मार्केटसाठी स्थापन करण्याचा  विचार मांडला, आणि २००३-०४ पहिल्या वर्षीच £200K ची मुसंडी मारली. त्यानंतर there was no looking  back.  कल्पनाने day to day विनय बरोबर Softspin चं काम केल्याने तिचा विनयविषयी व्यवसायी अनुभव  माझ्या पेक्ष्या अधिक जवळचा आहे. 

Softspin   स्थापना होऊन १०+ वर्ष एकत्र व्यवसाय या निमित्त विनयचे Entrepreneur mindset, Employee oriented attitude, down to earth वृत्ती, हे गुण कल्पना व मला जवळून अनुभवता आले. Technical learning, especially सॉफ्टवेयर, IT insight आणि मोबाईलवर तर त्याने मास्टरी मिळविली. याच दरम्यान  दीपक बरोबर या विषयी एक पुस्तकही मराठीत लिहून प्रसिद्ध केलं. याच वेळी  एक वर्ष विनय RCPS प्रेसिडेंटपण होता. Geometric प्रोग्रेसिव वाढत असलेल्या व्यवसायाचा व्याप सांभाळून विनयने रोटरीतून सामाजिक बांधिलकी निभावली. नवीन कुठलीही गोष्टीत शिकणे व पूर्ण झोकून देणे हा विनयचा स्वभाव मला खूप भावला.


 

व्यवसाय करतांना कधी कधी UPs & Downs ही बरेच आले. अशा वेळी विनय माझा सल्ला घेत असे, तासंतास आम्ही फोन वर बोलत असू. एखादी घटना articulate करणं त्याला छान जमायचं. In fact,

I used to envy him for this skill.


Softspin साठी विनय US, UK, जर्मनी  फिरला. अशाच एका UK visit ला  आम्ही दोघेच Edinburgh (स्कॉटलंड) Customer भेटीसाठी गेलो. आणि या पठ्ठाने गोऱ्या स्कॉटिश client बरोबर  software business सोडून Whiskey प्रोसेसिंग -  malting to maturation - taste कशी करायची आणि On-The-Rock व्हिस्की का म्हणतात व कशी घायची  येथ पर्यंत एक तासभर lectureच दिले (ps: प्राजबरोबर १० वर्षे कामाचा फायदा) आणि काय ब्रिटीश खुश. काहीही negotiate न करता सॉफ्टस्पिन ला order मिळाली. हे नवीन Sales technic मी विनय कडून त्यावेळी शिकलो.

विनयच्या  विविध भूमिका

विनयने प्रेमळ जावई, मुलगा, पती, वडील, भाऊ व मित्र सर्व भूमिका यशस्वीपणे केल्या. विनयच्या नावातच विनय आहे. 'विद्या विनयेन शोभते' हे त्याच्या बाबतीत सार्थ आहे. घरात लहानपणापासून वैद्यकीय वातावरण असल्याने विनय अर्धा काय मी तर म्हणेन तो 95% डॉक्टर होता. नियतीने त्याचेवर बरेच आघात केले होते. 

 

अगदी तरुणपणी मुंबई-पुणे बसमधून मागील सीटवर खिडकी जवळ बसून प्रवास करीत असतांना समोरून भरधाव येण्याऱ्या  ट्रकची साखळी त्याच्या उजव्या हाताच्या कोपराला जोरात लागली. क्षणभर काहीच कळत नाही, पण आघात इतका जबरदस्त होता की, काही मिनिटात त्याचा हात व शर्ट रक्ताने पूर्ण माखला. हे लक्षात आल्यावर जवळच्या हॉस्पिटलमध्ये Xray काढून मोठं ऑपेरेशन करावं लागलं, पूर्ण उजव्या हातात स्टील प्लेट कायमची screw केली गेली. 

 

अश्याच एकदा पुण्यात स्कूटर अपघातात त्याच्या उजव्या पायात कंबर ते गुडघ्यापर्यंत स्टील प्लेट कायमची screw केली गेली. गमतीने तो स्वतःला "I'm मॅन ऑफ स्टील" म्हणायचा. खूपदा विमानतळ वरील security करतांना त्याला हमखास मेटल डिटेक्ट व्हायचं, आणि त्यानंतर explanation, यामुळे सर्व प्रसंग interesting असायचा.

असा आणिक एक प्रसंग म्हणजे विनय दीपा आई आणि राधिका लॉन्ग ड्राईव्हसाठी पावसाळी वातावरण असतांना त्यांच्या मारुती van गाडीने निघाले. मुंबई पुणे रस्त्यावर स्टेडियम जवळ समोरून आलेल्या ट्रक ड्रायव्हरने अचानक ब्रेक केले. ट्रक स्किड होऊन विनय चालवत असलेल्या मारुती व्हॅनला अलगद चपराक देऊन गेला. प्रसंगावधान राखून विनयने  गाडी आधीच बाजूला घेतली होती पण गाडीने दोन उलटया घेतल्याचं. "काळ आला होता पण वेळ आली नव्हती" इतकंच विनय म्हणाला. थोडक्यात सर्व वाचले व फारशी इजा झाली नाही. पण मानसिक धक्क्यातून सर्वांना सावरायला वेळ लागला. 

 

या सर्व प्रसंगात तो कधीच खचला नाही, की त्याने हार मानली नाही. त्या सर्वांवर मात करून पुन्हा नव्या दमाने लढायला सज्ज असलेला विनय हे केवळ त्याच्या सकारात्मक विचारसरणीमुळेच शक्य झाले होते.

 

गेल्या दोन वर्षात त्याच लिव्हर रिप्लेसमेंट मोठे ऑपेरेशन झाले. त्यातूनही तो बरा होऊन त्याचा नवा जन्म झाला. त्यामुळे एक वेगळेच चैतन्य त्याच्या अंगी दिसले. आणि अजूनही नवनविन गोष्टी शिकण्यात तो कायम पुढाकार घेत असे. अशा या मित्राला 'एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी'  हे वाक्य त्याच्या बाबतीत सार्थ झालं, आणि ह्या मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद त्याला मिळेत असतांना गेले १-२ महिने पुन्हा नियतीने वेगळा डाव मांडला. अतिशय देखणा, राजबिंडा आणि मनाने तेवढाच निर्मळ असलेला विनय यावेळी संकटांवर पुन्हा जिद्दीने लढत होता. आणि त्याला विश्वास नव्हे खात्री होती की तो ह्या संकटावर मात करून पुन्हा एकदा हे जीवन अनुभवणार. पण झालं वेगळंच...!    

 

या  लढाईत दीपाने विनयसाठी केलेले हरएक प्रयत्न, तिचा संयम, शांत राहणे व घरात एक वेळ तीन Sr Citizen सांभाळून, त्यांची सर्व काळजी घेऊन - ती कायम हसरी असायची, हे तर beyond imagination आहे. तिने सर्व प्रसंगात विनयला दिलेली साथ आणि motivation हे एक कणखर वृत्ति / मन असल्यानेच होऊ शकलं. कुठलीही जबाबदारी घेतली की त्यात झोकून काम करणे ही विनयची वृत्ती दीपाच्या पूर्ण सहकार्यामुळे जोपासता आली. दीपामुळे विनय पुन्हा लढला. तिला माझा दंडवत...!  

 

विनय म्हणजे निर्मळ मनाचा आणि उत्साहचा अखंड झरा होता हे आपल्या सर्व मित्रांना माहितीच आहे. एक सच्चा मित्र, लहान मोठ्या सर्वांशी दिलखुलास गप्पा मारणारा, मनाने अतिशय निर्मळ आणि down to earth असा विनय. संकटात धावून जाणारा (माझा अनुभव*), एकदा हाती घेतलेले काम अतिशय चोख बजावणे असा  विनय सर्वांना परिचित होता. गेली 30-35 वर्षे असलेला सहवास आधी colleague, मग मित्र आणि हळूहळू त्याचे extended फॅमिली. जसा सहवास वाढत गेला तसे त्याचे एक एक पैलू समजले. एखादी गोष्ट करायची ठरवली की त्याच्या मुळाशी जाऊन ती समजावून घेणे हा त्याचा स्थायीभाव होता. 


वडिलांचे छत्र लवकर हरविल्याने घरातील कर्ता म्हणून आलेली जबाबदरी स्वीकारून एक आदर्श मुलगा, जावई, भाऊ, बाबा आणि दीपाचा जोडीदार सर्वच नाती विनयने यशस्वी निभावली. एक सच्चा मित्र म्हणूनही तो आज आपल्या सर्वांना परिचित आहे. आयुष्यात येणारे प्रत्येक challenge / संकट , केवळ त्याच्या सकारात्मक विचारसरणीमुळेच तो मात करू शकला.


माझा अनुभव

२००१ ला मी लंडनला असतांना माझ्या पुण्यातील घर, शेजारच्या फ्लॅट मधील गॅस सिलेंडर स्फोटाने मध्यरात्री, बेचिराख झाले. त्या रात्री २:३० वाजता हा प्रसंगात २० व्या मिनिटाला विनय माझा घरी पोहचला. कल्पना व घरातील सर्वांना धीर देत त्याने व दीपाने सावरले. १५ दिवस कल्पना, कविका, माझे वडील व आत्यास हॉस्पिटलमध्ये ठेवून, अक्षरशः विनय दीपाच्या मदतीने आम्ही सावरलो. आमचं घर व आमची आयुष्ये यांच्या पुन्हा उभारणीत विनयचा सिंहाचा वाटा आहे, हे कल्पना विकास कधीही विसरू शकत नाहीत. 

 

आम्हाला RCPS ला आणलेल्या या माझ्या मित्राला, नव्हे भावाला माझा शतशः प्रणाम…!

 

रो. विकास काकडे

WhatsApp Image 2021-09-21 at 5.49.03 PM (1).jpeg
WhatsApp Image 2021-09-21 at 5.49.03 PM.jpeg

उत्साहमूर्ती  विनय

२०१३ ला माझ्या सासुबाई गेल्या तेव्हा विनय धावत भेटायला आला होता. २०१४ ला कश्मिराच्या लग्नाला व्हील चेअर वरून गोळे काकांना विनयच घेऊन आला होता. ओंकारला पण त्याने मार्गदर्शन केले होते.


रोटरीमध्ये सगळ्यांना मदत करणाऱ्या, प्रत्येक इव्हेंटमध्ये उत्साहाने भाग घेणाऱ्या विनयच्या आजारपणाचे निदान होण्यापूर्वी  त्याला सतत येणाऱ्या cramps बद्दल आम्हाला सांगत होता, तेव्हा त्याला मी 'आरोग्य मुद्रा' पुस्तक दिले व काही मुद्रा करायला सांगितल्या होत्या. त्याप्रमाणे तो मुद्रा करत होता. जायच्या एक महिना आधी त्याने प्रदीपला निरोप दिला होता की "नेत्राला सांग मी मुद्रा करत आहे , मला फायदा होत आहे."

मार्चमध्ये विनय, दीपा व आम्ही ब्रेकफास्टसाठी भेटणार होतो. विनयची खूप इच्छा होती 'वाडेश्वर'ला भेटण्याची. पण कोरोनामुळे आम्ही 'वाडेश्वर' कॅन्सल केले व विनयला वाडेश्वरची उणीव भासू नये म्हणून मी इडली सांबार, चटणी, कांदा उत्तप्पा, उपमा, बटर टोस्ट असा बेत केला होता. खूप छान गप्पा झाल्या. विनय खूप खुश होता. त्याचे शब्द "पोटभर गप्पा, गरम गरम नाश्ता व खूप काही अंतरीचे बोल. ही सुखद सकाळ कधीच संपू नये अशीच यालाच भाग्य म्हणतात".

माझी स्वयंपाक घरातील अन्नपूर्णा म्हणजे भातुकली त्याला खूप आवडली. त्याने आवर्जून फोटो घेतले. खूप आनंदात होता विनय. "विनय माझी भातुकली तुझी वाट पाहत आहे! तुझे कौतुकाचे शब्द तिला ऐकायचे आहेत". ज्या पॉझिटिव्ह थिंकिंग ने विनय आजाराला सामोरा गेला ते अगदी कौतुक करण्यासारखे आहे. परंतु नियतीच्या मनात वेगळेच होते. विनयने आपले कर्म भोगले. कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपले कर्तव्य पार पाडले व हसतमुखाने मृत्यूला सामोरा गेला. शेवटी म्हणतात ना प्रत्येकाचा श्वास कुठपर्यंत चालेल ते  नियतीने ठरवलेलं आहे.. "खरा कर्मयोगी"

ऍन नेत्रा वाघ

 ....... आणिक स्मृती ठेवूनि जाती 

Vinay Sathe ShradhanjaliRavikiran Desai
00:00 / 05:16

गेल्या वर्षी विनयच्या वाढदिवसानिमित्त रविकिरण ने व्यक्त केलेल्या भावना

Vinay Sathe Birthday NoteRavikiran Desai
00:00 / 02:21

रो. रविकिरण देसाई

स्मृतिगंध

bottom of page